Mark 7

परूश्यांचा वरपांगी सोवळेपणा

1काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरुशलेम शहराहून आले होते, ते येशूभोवती जमले.

2आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध, म्हणजे विधीग्रंथ हात न धुता जेवताना पाहिले. 3कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांचे नियम पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत. 4बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसरे इतर नियमही पाळतात.

5मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या नियम प्रमाणे का जगत नाहीत? हात न धुता का जेवतात?”

6येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो,

‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात
परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.
7ते व्यर्थ माझी उपासना करतात
कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’

8तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.” 9आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्यासाठी सोयीस्कर पद्धत शोधून काढली आहे. 10मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आई-वडीलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्यास ठार मारलेच पाहिजे.’

11परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की, ‘तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला अर्पण करण्याचे ठरवले आहे.’ 12तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही. 13अशाप्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी करता.”

अंतर्यामीची भ्रष्टता

14तेव्हा येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या.

15बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्यास अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्यास अशुद्ध करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”

16
This verse is empty because in this translation its contents have been moved to form part of verse Mrk 7:17.
In this translation, this verse contains text which in some other translations appears in verses Mrk 7:16-Mrk 7:17.
17लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्यास या दाखल्याविषयी विचारले, 18तो त्यांना म्हणाला, “तुम्हासदेखील हे समजत नाही काय? जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्यास अशुद्ध करीत नाही हे तुम्हास समजत नाही का? 19कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते नंतर ते विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडते.” असे सांगून सर्वप्रकारचे अन्न त्याने शुद्ध घोषित केले. 20आणखी तो म्हणाला, “जे मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते मनुष्यास अशुद्ध करते. 21कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून, 22व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, 23या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अशुद्ध करतात.”

येशू सुरफुनीकी स्त्रीची मुलगी बरी करतो

24येशू त्या ठिकाणाहून निघून सोर आणि सिदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. तरी त्यास गुप्त राहणे शक्य नव्हते. 25पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. 26ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली. 27तो तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.” 28परंतु ती त्यास म्हणाली, “प्रभू, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.” 29तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या बोलण्यामुळे जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” 30मग ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरूणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.

येशू बहिऱ्या-तोतऱ्या मनुष्यास बरे करतो

31येशू सोर भोवतालच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलीसच्या वाटेने गालीलच्या सरोवराकडे आला. 32तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या-तोतऱ्या मनुष्यास येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवावा अशी विनंती केली. 33येशूने त्यास लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली व थुंकून त्याच्या जीभेला स्पर्श केला. 34त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, “इफ्फाथा.” म्हणजे मोकळा हो. 35आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जीभेचा बंद सुटला व त्यास बोलता येऊ लागले. 36तेव्हा हे कोणाला सांगू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले. ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”

37

Copyright information for MarULB